ऋषीची भाजी
अहो असे दचकू नका! मी काही इथे ऋषीच्या भाजीची रेसिपी पोस्ट करत नाहीय. नुकताच ऋषीपंचमीचा लेख वाचनात आला आणि ऋषीच्या भाजीची आठवण झाली. तसं ऋषीची भाजी करणं येरागबाळ्याच काम नाही. जे करत असतील त्यांना नक्कीच पटेल. बर्याच जणांना कदाचित माहितही नसेल ऋषीची भाजी म्हणजे काय? ब्रम्हदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्यांनी ७ ऋषी निर्माण केले वसिष्ठ, कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम आणि जमदग्नी. यांनाच सप्तर्षी म्हणून ओळखलं जात. यांच्यापासूनच पुढील पिढीची निर्मिती झाली. आपल्या घराण्याचे गोत्र सांगताना आपण ज्यांच नाव घेतो ते हेच आपल्या घराण्याचे मूळ पुरुष. ऋषीपंचमीच्या दिवशी याच ऋषींच स्मरण केलं जात. या दिवशी स्वकष्टाने निर्माण केलेलं म्हणजेच शेतीसाठी बैलांचा वापर न करता तयार झालेलं अन्न जसं कंदमूळ, रानपाला शिजवला जातो. त्यालाच ऋषीची भाजी असं म्हणतात. माझी ऋषीच्या भाजीशी ओळख झाली ती माझ्या आजीमुळे. भले घरी गणपती बसत नसले तरी ती भलं मोठं पातेलं भरून ऋषीची भाजी करायची. मग सगळ्या शेजाऱ्या-पाजाऱ्याना आणि आपल्या लेकींना ती भाजी पोहोचती करायची हा तीचा दरवर्षीचा परिपाठ असायचा. लहान...