ऋण गाण्याचे

काही वर्षांपूर्वी लोकसत्ताने एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. "ऋण गाण्याचे" हा निबंधाचा विषय होता. एखाद्या गाण्याने आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल झाला असेल तर त्या विषयीचा आपला अनुभव त्यात लिहायचा होता. विषय खरच खूप छान आणि वेगळा होता. मलाही माझा अनुभव त्यात मांडायचा होता पण काही कारणांमुळे (माझ्या आळशीपणामुळे) ते राहून गेलं.

मी तेव्हा SSC ला होते. फारशी स्कॉलर नव्हते पण ७०/७२% पर्यंत नक्कीच मजल मारायची. अन त्यात क्लास-बीस ला जाणं मला आवडायचं नाही. स्वताचा अभ्यास स्वतः करायचा. Final exam चे दिवस जवळ आले होते अन इतर मुलांप्रमाणे माझीही धडधड वाढायला लागली होती. एक तर बोर्डाची exam त्यात स्वताची शाळा सोडून दुसरीकडे जाउन पेपर लिहायचं टेन्शन. आजूबाजूच्या लोकांनी काहीतरी मोठा भयंकर इवेंट असल्या सारखी केलेली वातावरण निर्मिती त्यामुळे सॉलिड टेन्शन आलं होतं. नशीब त्यातल्या त्यात शाळा(सेंटर) तरी जवळ आणि चांगली आली होती.

शेवटी तो दिवस उगवला ज्या दिवशी माझा पहिला पेपर होता. रात्री तर झोप आलीच नाही. घरच्यांच्या आणि देवाच्या पाया पडून मी परीक्षेला निघाले. एकटी कसली जातेय? सहकुटुंब. बिग इव्हेंट होता बॉस एकटं जाउन कसं चालेल? हातपाय चांगलेच कापत होते. जेव्हा Examination Hall मध्ये जायची वेळ आली तेव्हा माझ्या आई बाबांची "कन्या सासुराशी जाये" अशी परिस्थिति, तर मला लहान मुलं पहिल्यांदाच आईचा हात सोडून शाळेत जातात तसं झालं होतं.

Examination Hall मध्ये बरीच नवीन मुलं होती, माझ्या वर्गातल्या जेमतेम दोघी तिघी होत्या. नवीन शाळा, नवीन क्लासरूम काही केल्या मन शांतच होत नव्हतं. शेवटची बेल झाली तशी examiner पेपर घेवून वर्गात आली. प्रार्थनेची वेळ झाली आणि...

"इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर होना
हम चाले नेक रस्तेपे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना"

केवढी विलक्षण ताकद होती त्या शब्दांमध्ये. माझं टेन्शन कुठल्या कुठे विरघळून गेलं. मन आता शांत झालं होतं आणि पेपर कसा हि येवो त्याला उभं आडवं फाडून खायला मी सज्ज झाले होते. दर दिवशी त्या शाळेत नवीन प्रार्थना व्ह्यायच्या जशा "हमको मनकी शक्ती देना" वगैरे पण पहिल्या दिवशीच्या प्रार्थनेने जी positive energy दिली होती ती मला अजूनही पुरतेय. आजही काही प्रॉब्लेम्स असतील तेव्हा मी ते गाणं आठवते.

माहित नाही त्या दिवशी जर ती प्रार्थना नसती तर काय झालं असत पण एक मात्र नक्की कि शब्दांमध्ये आणि गाण्यामध्ये नक्कीच प्रचंड ताकद असते तुम्हाला बदलायची.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कसं जगायचं?

मैत्री

Nothing