ऋषीची भाजी

अहो असे दचकू नका! मी काही इथे ऋषीच्या भाजीची रेसिपी पोस्ट करत नाहीय. नुकताच ऋषीपंचमीचा लेख वाचनात आला आणि ऋषीच्या भाजीची आठवण झाली. तसं ऋषीची भाजी करणं येरागबाळ्याच काम नाही. जे करत असतील त्यांना नक्कीच पटेल. बर्याच जणांना कदाचित माहितही नसेल ऋषीची भाजी म्हणजे काय?

ब्रम्हदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्यांनी ७ ऋषी निर्माण केले वसिष्ठ, कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम आणि जमदग्नी. यांनाच सप्तर्षी म्हणून ओळखलं जात. यांच्यापासूनच पुढील पिढीची निर्मिती झाली. आपल्या घराण्याचे गोत्र सांगताना आपण ज्यांच नाव घेतो ते हेच आपल्या घराण्याचे मूळ पुरुष. ऋषीपंचमीच्या दिवशी याच ऋषींच स्मरण केलं जात. या दिवशी स्वकष्टाने निर्माण केलेलं म्हणजेच शेतीसाठी बैलांचा वापर न करता तयार झालेलं अन्न जसं कंदमूळ, रानपाला शिजवला जातो. त्यालाच ऋषीची भाजी असं म्हणतात.

माझी ऋषीच्या भाजीशी ओळख झाली ती माझ्या आजीमुळे. भले घरी गणपती बसत नसले तरी ती भलं मोठं पातेलं भरून ऋषीची भाजी करायची. मग सगळ्या शेजाऱ्या-पाजाऱ्याना आणि आपल्या लेकींना ती भाजी पोहोचती करायची हा तीचा दरवर्षीचा परिपाठ असायचा. लहानपणी या भाजीची विशेष आवड नव्हती पण त्यातली कणसं आणि शेंगदाणे शोधून खाण हे माझ्या आवडीचं काम होतं. हळूहळू त्या भाजीचं महत्व कळायला लागलं आणि ती माझी कधी फेव्हरेट बनून गेली हे कळलच नाही. आता आजी नाही राहिली पण माझी आई उत्तम ऋषीची भाजी करते अगदी आजी करायची तशीच.

ऋषीपंचमीच्या दिवशी ऋषीची भाजी आणण हे अगदी माझं आवडीचं काम. यासाठी आईला लागणाऱ्या भाज्या म्हणजे भोपळा, पडवळ, कारली, काकडी, हिरवे वाटणे, ओले शेंगदाणे, भेंडी, सुरण, लाल माठाचे दांडे, लाल माठ, हिरवा माठ आणि शेवटच आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे अंबाडी. सकाळी ११ वाजेपर्यंत दादर मार्केटला (पणशीकरच्या दारात ज्या वसईवाल्या बसतात) पोहोचलात तर सगळ्या भाज्या व्यवस्थित पदरात पडतात नाही तर पालेभाज्या संपलेल्या असतात. एरवी कोणीही ढुंकूनही न पाहणाऱ्या भाज्यांना त्या दिवशी सॉलिड भाव चढलेला असतो. लाल माठाचे जाडे-जाडे दांडे निवडायला तर बायकांमध्ये चुरस लागलेली असते. काही ठिकाणी सर्व भाज्या चिरलेल्या एकत्रित मिळतात, काम लवकर आटपायचा हा जरी उत्तम पर्याय असला तरी त्यात ती घरी भाज्या आणून सगळ्यांनी मिळून साफ करायची, चिरायची जी काही लगबग असते ती मजा चिरलेल्या भाज्यांमध्ये कुठे? नेहेमी प्रमाणे मी घरातून पिशवी घेवून जायला विसरलेली असते. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या हजार छोट्या छोट्या पिशव्या सांभाळताना जीव मेताकुटीला येतो. त्यात मक्याच्या कणसांच(तीही २ प्रकारची आईसाठी सफेद कणसं आणि आमच्यासाठी sweet corns) आणि माठाच्या दांड्यांच ओझंच अधिक असतं. एकदा का सगळ्या भाज्या मिळाल्या कि दोन्ही हातांची कसरत करत त्या taxi मध्ये टाकल्या कि अर्ध काम फत्ते झालेलं असतं.

मग आम्ही सगळे मिळून ती भाजी निवडतो. आई कापून-चिरून कधी एकदा ती भाजी शिजायला टाकते आणि त्यातली कणसं कधी एकदाची शिजतात असं होतं मला. पहिल्यांदा घरात मी एकटीच लहान होती आता sis च्या २ लहान मुलांची competition असते मला कणीस खायला. पोट्टी खाण्याच्या बाबतीत अगदी माझ्यावर गेलीत किंबहुना माझ्या २ पावलं पुढेच. आता पूर्वी सारखी ८०% कणसं माझ्या वाट्याला येत नाहीत. असो, पण त्यांना आतापासून अशा भाज्या खायला आवडतात हे ही नसे थोडके. Credit goes to my mom...she is the Best!

एकंदर काय तर आई आणि मी आम्ही दोघींनी मिळून ऋषीची भाजी करायचा जो घाट घातलेला असतो तो आम्ही दोघीही पुरेपूर enjoy करतो.

Comments

Popular posts from this blog

कसं जगायचं?

मैत्री

Nothing