देवांचा बाजार!

आज सकाळी सकाळी mailbox मध्ये साईबाबा अवतरले होते. शिर्डी पाहिली नसल्यामुळे मोठ्या कुतूहलाने मी ते इमेल उघडलं. छे!!!!! साईबाबा होते कुठे त्यात? सोन्या-चांदीचं प्रदर्शन होतं ते. अन त्या प्रदर्शनात केविलवाणी दिसणारी ती उत्सवमूर्ती जीला करोडो रुपयांचे सोन्याचे हार घातले होते. ज्या साईबाबांनी आपले जीवन लोकांच्या सेवेसाठी वेचले जे कायम फकिरासारखे राहिले त्यांना सोन्या-चांदीच अप्रूप ते काय असणार? ते जर आज असते तर त्यांनी नक्कीच हे सगळं गरीब लोकांमध्ये वाटून टाकलं असतं. सोनं चांदी देणाऱ्या आणि घेणार्यांना साईबाबा अजून कळलेच नाही हे साईबाबांचं दुर्दैव! नाही का?

आजकाल देवस्थान हि फक्त श्रद्धास्थान राहिली नसून पैसे कमवायची नवीन साधनं बनली आहेत. या मे मध्ये आम्ही गोव्याला शांतादुर्गाला गेलो होतो. आम्ही घरून साग्रसंगीत साडी चोळीची ओटी घेतली होती. तिथे गेल्यावर पुजार्याने सांगितलं ५ नारळाचं तोरण द्यावं लागेल त्याचे पैसे counter वर भरून या. मंदिरा पासून नारळाचे stalls खूप दूर होते हे जेव्हा आम्ही पुजार्याच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा त्याने तिथे असलेले लोकांचे आलेले नारळ एकत्र करून ओटीचा कार्यक्रम आटपला.

परवाच लोणावळ्याला आमची कुलदेवता श्री एकविरा देवीच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो. नेहेमी प्रमाणे आम्ही घरूनच ओटीच सामान घेतलं होतं. साडी देताना आम्ही पुजार्याला सांगितलं कि साडी उघडून फक्त देवीच्या अंगाला लावा त्यावर त्यांचं नेहेमीच उत्तर मिळालं आजची पूजा झालेली आहे साडी उद्या नेसवू. अर्थात ते उद्या साडी नेसवतात कि नाही ते देवालाच माहित. ओटी भरून झाल्यावर अभिषेकासाठी ताटात १०० रुपये टाका म्हणून सांगयला तो विसरला नाही. वर्षातून एकदा देव दर्शनाला जाणार मग देवासाठी का हाथ आखडता घ्या या विचाराने आम्ही त्यात पैसे ठेवले. याच भाविकांच्या श्रद्धेचा (खरतर अंधश्रद्धेचा) हि लोकं फायदा उठवतात. देवासाठी खर्च करताना लोक मागेपुढे पाहत नाहीत हे त्यांना पक्क समजून चुकलेलं आहे. आणि हीच भाविकांची श्रद्धा encash करायचा हा नवीन बिझनेस सुरु झालेला आहे. बर एवढं करून जर हि संस्थान भाविकांसाठी योग्य त्या सोयीसुविधा पुरवत असतील तर गोष्ट वेगळी होती. मराठी लोकांची देवळ आणि तिथली स्वच्छता हा एक स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे.

कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे एक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. प्रचंड संख्येने इथे लोक येत असतात अर्थात या देवस्थानाच उत्पन्न हि उत्तम असणार बालाजीच्या धर्तीवर उत्तम मंदिराचा जीर्णोद्दार होऊ शकतो पण इथेही स्वच्छता आणि नियोजनाची वानवा आहे.

मुंबईतल्या देवळांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. सिटीलाईटच शीतलादेवी मंदिर. इथे एकदा देवीची माझ्या बहिणीने साडीने ओटी भरली होती. ओटी भरून झाल्यावर पुजार्याने साडी counter वर जमा करायला सांगितली. तिने ती साडी counter वर जमा केली तिला त्या साडीच्या किमतीची पावती दिली गेली आणि तिच्या समोरच त्यांनी ती साडी विकायला ठेवली.

तात्पर्य (अनुभवाने आलेले शहाणपण): तुमच्या श्रद्धेला देवळात काडीचेही मोल नसते. या पुढे कुठल्याही देवळात जाताना सव्वा रुपया पेटीत टाकून योग्य ती मदत गरजू व्यक्तीला करावी.

Comments

  1. देवा तुला शोधू कुठे??? अरे शोधू कुठे????

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कसं जगायचं?

मैत्री

Nothing