उन्हाळ्याची सूट्टी
एप्रिल महिना सुरु झाला कि चाहूल लागते ती वार्षिक परीक्षेची आणि त्यानंतर येणारी ती जादुई उन्हाळ्याची सूट्टी! आता त्या सुट्ट्यांची जागा सीक लीव्ह, पेड लीव्ह, Annual लीव्ह ने जरी घेतली असली तरी त्याला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सर नाही. ते दिवसच काही और होते. प्रत्येकाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या व्याख्या वेगळ्या होत्या. कोणासाठी सुट्टी म्हणजे मामाच्या गावाला जाणं, कोणासाठी मनसोक्त खेळणं, कोणासाठी नाचाचे/गाण्याचे क्लासेस करणं तर कोणासाठी नाटक/सिनेमे पाहणं. माझ्यासाठीं सुट्टी म्हणजें फक्त आणि फक्त गोष्टीची पुस्तकं! कधी एकदाची परीक्षा संपतेय आणि मी माझं पुस्तकांचं गाठोडं सोडतेय असं मला व्हायचं. नवीन पुस्तकं तर घ्यायचीच त्याच बरोबर जुनी पुस्तकं परत वाचून काढायची हेच माझे सुट्टीतले उद्योग. बाल-साहित्यातलं एकही पुस्तक मी शिल्लक ठेवलं नसेल. चिंगी, गोट्या, श्यामची आई, अकबर बिरबल, सिंदबादच्या सात सफरी, अलिबाबा चाळीस चोर, अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा, इसापनीती, पंचतंत्र, गुलबकावली, ग्रीमच्या परीकथा, चांदोबा, चंपक, ठकठक, विक्रम वेताळ, अरेबिअन नाईट्स, सिंहासन बत्तीशी, हितोपदेश, अलि...